Saturday, 2 August 2014

मावळ्यांची आचारसंहिता

|| छत्रपती सुत्र ||

वारसदार : मावळ्यांची आचारसंहिता

www.facebook.com/chhatrapatisutra

छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्यांचा आचारधर्म कसा असावा ?

छत्रपती शिवराय हे महापुरुष होते.सामान्य माणसामध्ये असामान्य चेतना निर्माण करून स्वराज्य स्थापण्याचा दृढसंकल्प त्यांनी पूर्ण केला.आपण त्यांच्या संपूर्ण चरित्रातून बोध घेऊन आदर्श वर्तन करायला हवे,त्यासाठी छ.शिवरायांच्या खालील गोष्टींचे अनुकरण करावे.

१.छ.शिवरायांनी वडीलधाऱ्यांचा सन्मान केला.शहाजीराजे,राजमाता जिजाऊ व इतर.
आपणही आई-वडील व वडीलधाऱ्यांचा मान ठेऊया.

२.छ. शिवरायांनी परस्त्रीस मातेसमान मानले.हा स्त्रियासंदर्भात शुद्ध दृष्टीकोन अंगी बानवुया.

३.छ.शिवरायांनी परधर्माचा द्वेष केला नाही,उलट त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे जगण्यास सहकार्य केले.हा धर्म सहिष्णुतेचा गुण आपणही अनुसरुया.

४.छ.शिवरायांनी ज्ञानाचे महत्व ओळखून आपल्या मुलास कर्मवीर संभाजी राजांना पंडीत बनविले.आपणही आपल्या मुलां-मुलींना असे सखोल ज्ञान देऊया.

५.छ.शिवराय आयुष्यभर व्यसनांपासून आणि रंगेलपणापासून जाणीवपूर्वक दूर राहिले.दारु,जुगार व परस्त्रीगमन ही व्यसने व्यक्तीला,त्याच्या कुळाला आणि समाजाला हानी पोहोचवतात.इतकेच नव्हे तर उच्च ध्येय,आदर्श जीवन या मार्गातील अडथळा बनतात.म्हणून या पासून कटाक्षाने छ.शिवराय दूर राहिले.आपण त्यांचे निष्ठावान अनुयायी असू तर आपणही अशा गोष्टी त्याज्य मानल्या पाहिजेत.

६.छ.शिवरायांनी आपली सून ताराराणी यांना युद्धकलेचे,राज्यकारभाराचे शिक्षण दिले होते.आपण आपल्या लेकी-सुनांना वेगवेगळे शिक्षण घेण्याचे कितपत स्वातंत्र्य देतो ? घरकारभारात व्यवसाय-उद्योगामधे कितपत तरबेज करतो ? शिवप्रेरणेने याही गोष्टी केल्या पाहिजेत.

७.छ.शिवरायांनी अंधश्रद्धा नाकारल्या.सतीप्रथा नाकारली.राजाराम पालथा जन्मला म्हणून शांती करणे नाकारले,कुठलीही स्वारी/लढाई करताना मुहूर्त बघितला नाही.ते पूर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करीत राहिले आणि जिंकत गेले.जरी पुरंदरचा तह करावा लागला तरी आपला पराभव हा कायमचा पराभव न मानता जीवघेण्या संकटावर मात करत शेवटी अंतिम ध्येय गाठलेच.हा मनाचा भक्कमपणा आपल्याही रक्तात येऊ द्या.

८.छ. शिवरायांनी धर्माला जीवन जगण्याचा मार्ग एव्हढेच महत्व दिले.जेंव्हा धर्माची तत्वे स्वाभिमानी माणूस म्हणून जगण्याच्या आड येऊ लागतात तेंव्हा त्यांनी प्रसंगी धर्मतत्वे बाजूला सारली.
उदा.धर्मतत्वानुसार शूद्रांना शत्र धरण करण्याचा अधिकार नव्हता,छ.शिवरायांनी महार,मांग,रामोशी,आगरी,भंडारी या सर्वांच्या हातात शत्रे दिली.
सती परंपरा मोडून काढली.
जर धर्म तुम्हाला माणूस म्हणून न्याय हक्क देत नसेल,सन्मान देत नसेल तर धर्माची दुरुस्ती आवश्यक असते.पण धर्मप्रमुख  [ शंकराचार्य ] या गोष्टीला तयार होत नाहीत.अशावेळी आपल्यावर लाजिरवाणी गुलामी लादणाऱ्या धर्माचा त्याग करून आत्मसन्मान,स्वाभिमान जपला पाहिजे.माणूसपण जपणाऱ्या धर्माचा स्वीकार करणे काहीही गैर नाही.
छ.शिवरायांच्या जीवनकार्याची पुढील पायरी म्हणून हा विचार स्वीकारला पाहिजे.

९.छ.शिवरायांनी रयतेस लेकराप्रमाणे  वागविले.त्यांच्यावर चुकुनही अन्याय होणार नाही,याची दखल घेतली.स्वराज्यासाठीसुद्धा आर्थिक त्रास दिला नाही.बलवान माणसाने दुबळ्याचे रक्षण करावे हे त्यांचे तत्व होते.याचे आपणही काटेकोर पालन करावे.

१०.छ.शिवरायांनी स्वदेश व स्वभाषा यांचा अभिमान बाळगला.शत्रूशी शत्रूप्रमाणे व मित्रांशी आदर्श मित्राप्रमाणे ते वागले.आपणही याचा बोध घ्यावा.

११.छ.शिवरायांनी प्रत्येक निर्णय पूर्ण विचारांती घेतला.दुसऱ्याच्या शब्दांवर भरवसा ठेऊन त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.प्रत्येक गोष्ट नीट   पारखून योग्य निर्णय घेतला.
आपण मात्र हलक्या कानाचे असतो.
'देव,देश अन धर्मासाठी प्राण घेतला हाती' म्हणताच आपले रक्त सळसळू लागते.आता देशाबद्दल रक्त सळसळायला हवे.पण देशप्रेम म्हणजे काय ? हेही नीट तपासून पहायला हवे.
एखादा शिक्षक देशप्रेमाच्या गोष्टी-गप्पा मारतो पण वर्गात नीट शिकवीत नाही.तर तो देशद्रोही असतो.कारण तो या देशातील अनेक पिढ्यांचे नुकसान करतो.अशा प्रकारे देशप्रेमाच्या व्याख्या तपासून घेतल्या पाहिजेत.
त्याचबरोबर देव व धर्माबद्दल आपण किती व कसा अभिमान बाळगायचा हेही ठरविले पाहिजे.गौतमऋषीची निष्पाप पत्नी अहिल्या हिच्यावर देवाचा राजा इंद्र बलात्कार करतो.राजा जालंधराची पत्नी वृंदा हिच्यावर कपटाने विष्णू बलात्कार करतो.अशा देवांच्या अनेक कथा ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहिल्या आहेत.देव कुणी निर्माण केले ? देवांचे वर्तन हे आदर्श आहे काय ? आपण त्यांचे अनुकरण करू शकतो काय ? तसे करणे योग्य होईल काय ? याचा विचार करावा,मगच त्याबद्दल अभिमान बाळगावा.

१२.छ.शिवराय म्हणजे आदर्श नेतृत्व !
छ.शिवराय म्हणजे न्यायप्रिय राजा.
छ.शिवराय म्हणजे एक जनकल्याणकारी विचारधारा
छ.शिवराय म्हणजे बहुजनांचा स्वाभिमान,महाराष्ट्राची उंच मान.
हे लक्षात ठेवायला हवे.त्यांना कमीपणा येईल असे वर्तन कोणत्याही शिवभक्तांकडून होता कामा नये.
धर्माबद्दल अभिमान बाळगताना त्या धर्मात माझे स्थान काय,त्या धर्मात माझ्या हितासाठी कोणत्या योजना आहेत आणि तो धर्म मला माणूसपणाचे न्याय हक्क देतो काय ?
ह्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची आज वेळ आली आहे.कृती करण्याची वेळ आलेली आहे.जर धर्म मला शुद्र,हलका,गुलाम म्हणत असेल,ज्ञानाच्या सत्तेच्या अधिकारापासून दूर ढकलू पहात असेल आणि हजारो वर्ष मुठभर लोकांच्या कल्याणाच्या गोष्टीच महत्वाच्या मानत असेल तर अशा धर्माविषयी मला आत्मियता कशी वाटणार ?
धर्मामध्ये माझे स्थान काय हे अधिकृतरित्या कळल्याशिवाय धर्मासाठी प्राण देण्याची गोष्ट मी करणार नाही,असेच आता मला म्हणावे लागेल.सगळ्यात महत्वाचे म्हणजे देव व धर्म या सगळ्यांचा फायदा कोण करून घेतो,हे आता तपासावे लागेल.कारण विचारी माणसांचे भांडण देवाशी किंवा धर्माशी नसते,तर त्याच्या आधारे दुसऱ्याची पिळवणूक,छळ,अप्रतिष्ठा,अन्याय करणाऱ्या धर्ममार्तंडाशी असतो आणि हे आता जाणीवपूर्वक करावेच लागेल..
जय जिजाऊ - जय शिवराय - जय शंभूराजे
जयतु शिवधर्म - जयतु शिवराष्ट्र.

No comments:

Post a Comment