Tuesday, 16 December 2014

मात

|| छत्रपती सुत्र ||

उसन्या बळावर लढणारे लोक दुर्बलतेचे पाईक आहेत.

उसने बळ घेऊन ओरडायला ताकत लागत नाही,खरी ताकत तर शांत रहायला लागते.

तुमचे शांत राहणे ही तुमची दुर्बलता नसुन ती उसन्या बळावर ओरडणाऱ्यांच्या आवाजावरील दणदणीत मात आहे.

© अनिल माने.
=========================

वणवा गैरसमजांचा

|| छत्रपती सुत्र ||

जंगलात पेटलेल्या वणव्यात जोपर्यंत पालापाचोळा येत असतो तोपर्यंत हा वणवा न विझता तसाच पेटत राहतो आणि जंगलाची राख करतो.

नात्यांमधे दुरावा निर्माण करणारा वणवा हा अशाच गैरसमज आणि अफवांच्या पालापाचोळ्यावर पेटत राहतो.हा पालापाचोळाच संपला की ही वणवाही आपोआप विझुन जातो.

© अनिल माने.
===========================

सातत्य

|| छत्रपती सुत्र ||

शेवटच्या घावाने दगड फुटला म्हणुन आधीच्या घावांचे काहीच महत्व नाही असे नाही.

प्रयत्नातील सातत्यच तुमच्या यशाचे कारण बनते.
जशी पाण्याची संततधार कठीण खडकाचीही माती करुन टाकते..

© अनिल माने.
=======================

धार

|| छत्रपती सुत्र ||

बोथट शस्त्रे रणांगणावरील लढाईत निरुपयोगी ठरतात,
परंतु त्यांना धार लावली तर त्यांचेही मुल्य वाढते.

स्पर्धेच्या युगात विचारांची धार नसलेले लोक मागे पडतात,
परंतु बुध्दीला विचारांची धार असेल तर ते स्पर्धेत विजयी होतात.

© अनिल माने.
===========================

उत्कर्ष आणि संघर्ष

|| छत्रपती सुत्र ||

उत्कर्षाच्या मुक्कामाला पोचायचे असेल तर संघर्षाचा मार्ग पार करावा लागतो.

या संघर्षात प्रतिस्पर्धी कोण आहे त्यापेक्षा त्याच्या आणि आपल्या जमेच्या व कमकुवत बाजुंचे योग्य ज्ञान असेल तर या संघर्षाची पातळी कमी होते.
मात्र संघर्ष अटळ असतो.

© अनिल माने.
===========================

शोधा म्हणजे सापडेल

|| छत्रपती सुत्र ||

विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहीरीतील दगडांकडे नसते तर त्या दगडांमधेही कुठेतरी पाणी दिसते का हेच ते पाहत असतात.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचे निरीक्षण करतानाही त्याच्यातील वाईट गोष्टीऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टीसुध्दा सापडतील.

© अनिल माने.
===========================

उत्कर्ष

|| छत्रपती सुत्र ||

स्वतःचा उत्कर्ष होण्यासाठी इतरांचा द्वेष करुन काहीच मिळत नाही.

स्वतःच्या दुर्गुणांवर प्रेम आणि इतरांच्या सद्गुणांचा द्वेष करायचे सोडुन दिले तर तुमचाही उत्कर्ष निश्चित आहे.

© अनिल माने.
===========================

धागा

|| छत्रपती सुत्र ||

संवाद हा नात्यांना जुळवुन ठेवणारा धागा आहे.हा धागा आहे तोपर्यंत नात्यांमधे जिव्हाळा असतो.

जेव्हा हा धागा सैल होईल तेव्हापासुन नात्यातील दरी वाढत जाते.

© अनिल माने.
===========================

सुरुवात

|| छत्रपती सुत्र ||

आयुष्यात कोणतीही गोष्ट पुर्ण करायची असेल तर आधी त्या गोष्टीला सुरुवात करावी लागते.

केवळ सुरुवात करण्यावाचुनच आयुष्यात ठरवलेल्या बहुतांश गोष्टी तशाच राहुन जातात.

© अनिल माने.
===========================

आकलन - विश्लेषण

|| छत्रपती सुत्र ||

भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमानाचे आकलन करता आले पाहिजे,त्यासाठी भुतकाळाचे विश्लेषण आवश्यक असते.

उंचावर जायचे असेल तर आधी आपण खोलात आहे याची जाणीव झाली पाहिजे,त्यासाठी खोलीचा अंदाज घेता यायला हवा.

© अनिल माने.
===========================

स्वतःसाठी वेळ द्या

|| छत्रपती सुत्र ||

धावपळीच्या,धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात माणसांना सगळ्या गोष्टींचा विचार विचार करायला वेळ आहे,पण स्वतःबद्दल विचार करायला वेळ नाही.

जीवनातील प्रत्येक टप्प्यावरील आनंद मिळवा,स्वतःसाठी वेळ द्या.तुमचे हे जीवन परत नाही.

© अनिल माने.
=======================

आत्मपरीक्षण : एक गरज

|| छत्रपती सुत्र ||

आत्मपरीक्षण ही स्वतःला सुधारण्याची आणि अथक परीश्रम ही स्वतःची प्रगती करण्याची सोपी प्रक्रिया आहे.

आत्मपरीक्षणाने आपल्या कमतरता शोधता येतात आणि अथक परीश्रमाने त्या दुर करुन यश मिळवता येते.

© अनिल माने.
===========================

प्रयत्नवाद आणि आशावाद

|| छत्रपती सुत्र ||

प्रयत्नवादी लोक ध्येय पार करण्यात अपयशी ठरले तरी खचुन जात नाहीत,
आपले आणि ध्येयातील अंतर आपण कमी करु शकलो याबाबत ते आशावादी असतात.

प्रयत्नवादाला आशावादाची जोड असेल तर आपल्यातला आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि हीच ध्येयपुर्तीसाठी सर्वात आवश्यक असणारी गोष्ट आहे.

© अनिल माने.
===========================

स्वयंप्रकाशित

|| छत्रपती सुत्र ||

चमकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे.

दुसऱ्याच्या प्रकाशात तुम्ही चमकु शकत नाही,दुसऱ्याच्या तेजात तुम्ही झळकु शकत नाही.

© अनिल माने.
===========================

आचरण

|| छत्रपती सुत्र ||

मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्यावरच माणुस मोठा होत नाही,
तर छोट्या छोट्या गोष्टी समजुन घेतल्यानेही तो मोठा होतो.

विचार छोटा असो वा मोठा,
त्याच्या आचरणानेच त्याला मुल्य प्राप्त होते.

© अनिल माने.
===========================

कर्तव्य

|| छत्रपती सुत्र ||

आयुष्यात अनेकदा येणाऱ्या संभ्रमाच्या प्रसंगांतुन मार्ग काढण्यासाठी नेहमी आपल्या कर्तव्याला महत्व द्या.

तुम्ही ज्यावेळी कर्तव्याला प्राधान्य देऊन धडपड चालु करता,
त्यावेळी बाकी साऱ्या संभ्रमाच्या समस्यांवर सुध्दा मार्ग निघायला सुरुवात होते..

@ अनिल माने.
===========================

विचार स्वभावाचे निदर्शक

|| छत्रपती सुत्र ||

आपल्या विचारातच उंची असेल तर शत्रुच्या मनातसुध्दा आपल्या बद्दल आदर निर्माण होतो.

विचार हेच माणसाच्या स्वभावाचे निदर्शक असतात.

© अनिल माने.
===========================

स्वतःचे मत

|| छत्रपती सुत्र ||

इतरांचे मत हे तुमचेच मत म्हणुन सांगितले तर इतरांच्या मतांवर उठणाऱ्या प्रश्नांचे उत्तर सुध्दा तुम्हाला स्वतःलाच द्यावे लागते.

घडणाऱ्या घटनांकडे स्वतःच्या नजरेने पाहिल्यावर जे दिसते ते इतरांच्या नजरेतुन दिसतेच असे नाही.

© अनिल माने.
===========================

उंची

|| छत्रपती सुत्र ||

पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने सर्वांवर बरसते.

माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणुस आयुष्यात हवी ती उंची गाठु शकत नाही.
परीश्रमाने गाठलेली उंचीच माणसाच्या आयुष्यात आनंदाची बरसात करु शकते.

© अनिल माने.
=========================

ज्ञान आणि कृतीशिलता

|| छत्रपती सुत्र ||

लक्ष्यापर्यंत पोचण्याचे रहस्य केवळ रस्त्यावरील दिशादर्शक दगडावरील अंतर वाचता येण्याचे ज्ञान नाही तर आपण स्वतः ते लक्ष्य गाठण्यासाठी केलेली पायपीट हे पण आहे.

ज्ञानासोबत कृतीशिलता हाच लक्ष्य गाठण्याचा योग्य मार्ग आहे.या मार्गाला कोणतीच आडवाट नाही.

© अनिल माने.
===========================

वर्चस्वाची लढाई

|| छत्रपती सुत्र ||

वर्चस्वाच्या लढाईत नैतिकतेचा अंत होतो.

सिंह एकटा असला तरी जंगलाचा राजाच असतो,
परंतु राजेपणाच्या वर्चस्वासाठी जेव्हा सगळे सिंह एकमेकांशी लढुन मरतात,तेव्हा जंगलातील लांडगेसुध्दा त्यांचे लचके तोडुन नेतात.

© अनिल माने.
===========================

वाद आणि नाती

|| छत्रपती सुत्र ||

वादात जिंकल्यानंतर मिळालेला क्षणिक आनंद तुमच्यात गर्व निर्माण करतो.

वादामध्ये जिंकणारा माणुस नात्यांमध्ये नेहमीच हरतो..

© अनिल माने.
=========================

गरुडभरारी

|| छत्रपती सुत्र ||

बोलके पोपट मोठमोठ्या गप्पा मारत असताना गरुड मात्र शांत बसुन राहणे पसंत करतात.

कारण गरुडाला माहित असते की पोपट कितीही मिठुमिठु बोलु शकतो,
परंतु वेळ आल्यावर गरुडाप्रमाणे उंच आकाशात भरारी मारु शकत नाहीत.

© अनिल माने.
========================

ठेच

|| छत्रपती सुत्र ||

सरळ वर पाहुन पुढेच चालत राहणाऱ्यांना अधेमधे लागणाऱ्या ठेचा या कधीकधी आवश्यकच असतात.ठेच लागल्याशिवाय माणुस थांबत नाही.

ही ठेच माणसात आत्मपरिक्षणाची गरज निर्माण करते,आत्मपरीक्षणाने माणसाला आपल्या मागील चुका सुधारण्याचे भान येते.

© अनिल माने.
===========================

आनंद निर्मीतीचा

|| छत्रपती सुत्र ||

इतरांनी निर्माण केलेल्या गोष्टीचा उपभोग सर्वजण घेऊ शकतात,परंतु त्या गोष्टीच्या निर्मितीचा आनंद फक्त ती गोष्ट निर्माण करणाराच घेऊ शकतो.

सत्ता उपभोगण्यासाठी परकीयांचे जोडे उचलणाऱ्या वतनदारांपेक्षा स्वराज्य निर्मितीचा आनंद घेणारे मावळेच आज जास्त गौरवान्वित केले जातात.

©Copyright अनिल माने.
===========================

मार्ग

|| छत्रपती सुत्र ||

किल्ला किती जरी कठिण असला तरी तो सर करण्याचा एखादातरी मार्ग असतोच.

संकट कितीही मोठे असले तरी त्या संकटावर मात करण्याचा एकतरी मार्ग नक्कीच असतो.

© अनिल माने.
===========================

संवाद

|| छत्रपती सुत्र ||

गैरसमजाचा वणवा नात्यांचे जंगल जाळुन टाकतो.

हा वणवा जागच्या जागीच विझविण्यासाठी संवादाच्या सरी कोसळाव्याच लागतात.

© अनिल माने.
=======================

Sunday, 10 August 2014

काळाची गोष्ट

|| छत्रपती सुत्र ||

येणाऱ्या भविष्यकाळात रडावं लागु नये
म्हणुन
आताच वर्तमानकाळातच तुम्हाला लढावं लागेल.

परंतु आता वर्तमानकाळात लढावं लागण्यासाठी
आधी भूतकाळातुन चांगला धडा घेऊन बाहेर पडावं लागेल...

© अनिल माने.

Saturday, 9 August 2014

काळजी आण कृती

|| छत्रपती सुत्र ||

काळजी करुन दुःख कमी होत नाही तर कृती केल्यानेच त्या दुःखावर मात करता येते.

काळजी केल्याने कृतीसाठी आवश्यक ताकद वाया जाते आणि दुःख आहे तसेच राहते..

© अनिल माने.

Wednesday, 6 August 2014

कर्तव्य

|| छत्रपती सुत्र ||

आयुष्यात अनेकदा येणाऱ्या संभ्रमाच्या प्रसंगांतुन मार्ग काढण्यासाठी नेहमी आपल्या कर्तव्याला महत्व द्या.

तुम्ही ज्यावेळी कर्तव्याला प्राधान्य देऊन धडपड चालु करता,
त्यावेळी बाकी साऱ्या संभ्रमाच्या समस्यांवर सुध्दा मार्ग निघायला सुरुवात होते..

@ अनिल माने.

वाट

|| छत्रपती सुत्र ||

तुम्ही चुकीच्या वाटेवरुन चालत असाल तर तुमच्या शत्रुच्या संख्येत वाढ होईल,
कारण अशा वाटेवरुन चालताना तुम्ही चांगल्या माणसांशी शत्रुत्व घेत असता.
अशा वाटेवरुन माघारी फिरणेच योग्य आहे.

तुम्ही योग्य वाटेवरुन चालत असाल तरीही तुमच्या शत्रुच्या संख्येत वाढच होईल,
कारण अशा वाटेवरुन चालताना तुम्हाला वाईट माणसांशी शत्रुत्व घ्यावे लागते.
अशा वाटेवरुन माघारी न फिरता पुढे चालत राहणेच योग्य आहे..

@ अनिल माने.

Monday, 4 August 2014

दिवा आणि वात

|| छत्रपती सुत्र ||

दिव्याची वात नेहमी तेवत ठेवायची म्हटले तर वातीला सतत तेल पुरवावे लागतेच,
त्यासोबत वाऱ्यापासुन त्या वातीचे संरक्षण करण्यासाठी आडोसाही द्यावा लागतो.

माणसाच्या प्रगतीच्या दिव्याची वातही तशीच आहे.
तिला सतत ध्येयाचे तेल तर पुरवावे लागतेच,
त्यासोबत अपयशाच्या वाऱ्यापासुन संरक्षण करण्यासाठी प्रयत्नांचा आडोसाही द्यावा लागतो..

© अनिल माने.

नियोजित वाटचाल

|| छत्रपती सुत्र ||

वाऱ्याच्या दिशेने आपली दिशा आणि योजना बदलणारी माणसं स्वतःची ओळख निर्माण करु शकत नसतात.

नाव तर त्यांचे घेतले जाते
जे वारे विरुध्द दिशेने वाहत असताना सुध्दा नियोजित वाटचाल करुन आपलं निशान आपल्या ध्येयाच्या शिखरावर फडकवतात..

© अनिल माने.

बदलाची सुरुवात

|| छत्रपती सुत्र ||

जो बदल तुम्हाला समाजात हवा आहे,
तो बदल प्रथम तुमच्यात घडवा.

प्रत्येक बदलाची सुरुवात स्वतःपासुन होते.

@ अनिल माने.

चांगली माणसं

|| छत्रपती सुत्र ||

आपल्या जवळ असणाऱ्या वाईट माणसांना दूर केल्याशिवाय,
आपल्यापासुन दूर असणाऱ्या चांगल्या माणसांना जवळ करता येत नाही.
ही चांगली माणसं त्यांच्या चांगल्या अनुभवामुळे नेहमीच आठवणीत राहतात.

माणसं सुगंधी फुलांनाच जवळ करतात,
दुर्गंधी फुलांना कोणी पाणी सुध्दा घालत नाही..

© अनिल माने.

स्वयंसिध्द

|| छत्रपती सुत्र ||

तुम्हाला जर एखादे काम चांगल्या पध्दतीने व्हावे असे वाटत असेल
तर एक करा,
ते काम स्वतःच करा.

जो बदल आपल्याला इतरांमध्ये हवा असतो,
तो बदल आधी स्वतःमधे घडवायला हवा..

© अनिल माने.

प्रतिष्ठा आणि सावली

|| छत्रपती सुत्र ||

माणसाची प्रतिष्ठा ही त्याच्या सावलीसारखी असते.

जेव्हा ही माणसाच्या पुढे चालते तेव्हा खुप मोठी होत जाते
आणि
जेव्हा मागे चालते तेव्हा खुप छोटी होत जाते..

© अनिल माने.

गरज

|| छत्रपती सुत्र ||

एखाद्या गोष्टीची तीव्र गरज निर्माण झाल्याशिवाय त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी धाडसी पावले उचलली जात नाहीत.

ध्येयाचा ध्यास लागला तरच श्रमाचा त्रास होत नाही..

@ अनिल माने.

यशाचे नियोजन

|| छत्रपती सुत्र ||

अपयशासाठी परिस्थितीला दोष देणे हे मैदानातुन पळ काढण्यासारखे आहे.

आत्मपरीक्षण करुन आपण कुठे कमी पडलो हे शोधता आलं
तर
भावी यशाचे यशस्वी नियोजन करता येते..

@ अनिल माने.

यशाचे मोजमाप

|| छत्रपती सुत्र ||

तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या उंचीवर पोचलात यावरुन तुमच्या यशाचे मोजमाप होत नाही.

खाली पडुनसुध्दा तुम्ही पुन्हा किती वेळा परत उसळी मारुन उभे राहिलात यावरुन तुमच्या यशाचे मोजमाप होते..

@ अनिल माने.

उच्च ध्येय

|| छत्रपती सुत्र ||

एखादा सामान्य माणुसही जेव्हा उच्च ध्येय नजरेसमोर ठेवुन समाजात वावरु लागतो,
तेव्हा धाडसीपणा आणि साहसीपणा तिच्यात आपोआप निर्माण होतो.

@ अनिल माने.

बदल हातातले

|| छत्रपती सुत्र ||

भुतकाळात जावुन कोणत्याही गोष्टींची पुन्हा नव्याने सुरवात करणे कुणालाही शक्य नाही
परंतु
आज सुरुवात करून आपला येणारा भविष्यकाळ चांगला करणे,
हे कुणालाही शक्य आहे.

सर्वच नसले तरी निदान काही बदल तरी माणसाच्या हातात असतातच..

@ अनिल माने.

चांगली सुरुवात

|| छत्रपती सुत्र ||

यशस्वी लोक कधीच आपल्या निकालाचे नियोजन करून ठेवत नाहीत.

ते फक्त सुरवात कशी करायची ह्यावर जास्त भर देतात
कारण
सुरुवात ही व्यवस्थित आणि संघर्षाने केलेली असेल तर निकाल हा नेहमी त्यांच्याच बाजुने असतो..
नेहमीच चांगली सुरवात करा..

@ अनिल माने.

चुका आणि शिक्षण

|| छत्रपती सुत्र ||

चुका म्हणजेच शिक्षण
आणि
शिक्षण म्हणजेच जुन्या चुका परत होऊ न देणे.

काही गोष्टी या अनुभवातुनच शिकता येतात.त्यामुळे चुकांतुन शिकतच पुढे जायचे असते.

@ अनिल माने.

जीवनाच्या बाजु

|| छत्रपती सुत्र ||

नेहमी यश मिळत असेल तर आपल्या जीवनाची केवळ एकच बाजु कळते,
पण अपयश जीवनाची दुसरी बाजु दाखवते..

@ अनिल माने.

मैलाचा दगड

|| छत्रपती सुत्र ||

अपयश म्हणजे संकट नाही
तर
आपल्या ध्येयाच्या मार्गावर दिशा दाखवणारा मैलाचा दगड आहे..

@ अनिल माने.

राजमार्ग

|| छत्रपती सुत्र ||

विनाकारण शत्रुंची संख्या वाढवुन वाटेत अडचणी निर्माण करुन घेण्यापेक्षा
नेहमी मित्रांची संख्या वाढवुन यशाचा राजमार्ग तयार करत रहा..

@ अनिल माने.

संधी अडचणीतील

|| छत्रपती सुत्र ||

प्रत्येक अडचणीमध्ये एक संधी दडलेली असते.

जो अडचणींनी निराश होतो तो कायमचा संपून जातो.
पण
जो अडचणीवर मात करून तिच्यातल्या संधीचा फायदा घेतो तोच पुढे जातो..

@ अनिल माने.

पाठलाग

|| छत्रपती सुत्र ||

हे जग धाडसी लोकांकरीताच आहे.

स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला अजुन किती मैल पळावे लागेल हे कोणीच सांगु शकत नाही.
पण तुम्हाला पळावेच लागेल कारण थांबला तो संपला..

@ अनिल माने.

यशाची पायरी

|| छत्रपती सुत्र ||

अपयश हीच यशाची पहीली पायरी नसते..
कारण
योग्य नियोजन,योग्य अभ्यास आणि योग्य प्रयत्न असतील पहीली पायरीसुध्दा यशाचीच असते..

@ अनिल माने.

धाडसी निर्णय

|| छत्रपती सुत्र ||

ज्याला निर्णय घेता येत नाही
त्याला कृती करता येत नाही
आणि
ज्याला कृती करता येत नाही
त्याला कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.

केवळ एक धाडसी निर्णयच तुमचे संपुर्ण आयुष्य बदलु शकतो..

@ अनिल माने

संधीचा उपयोग

|| छत्रपती सुत्र ||

प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या.
प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे
आणि
काळ फार वेगाने पुढे जात आहे.
म्हणून
आपल्या संपुर्ण ताकदीने कामाला लागा
तेव्हाच तुम्ही ध्येय गाठु शकाल..

@ अनिल माने.

चांगुलपणा

|| छत्रपती सुत्र ||

मनुष्य गेल्यानंतर मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो..
बाकी सगळं नष्ट होते..

@ अनिल माने.

जोखिम

|| छत्रपती सुत्र ||

वेळोवेळी बदल करण्यात जोखिम नसुन बदल न करण्यात जोखिम आहे.

बदल केल्याने जीवनाचा प्रवास चालु राहतो
पण
बदल न केल्याने आपण आहे तिथेच अडकुन पडतो..

@ अनिल माने.

Sunday, 3 August 2014

उपस्थिती - अनुपस्थिती

|| छत्रपती सुत्र ||

आपल्या अनुपस्थिती मुळे एखाद्याच्या आयुष्यात काहीच फरक पडत नसेल
तर
आपल्या उपस्थीती मुळे सुध्दा त्याच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही..

@ अनिल माने.

मंझिल

मंझिल तो मिल ही जायेगी

चाहे भटककर ही सही

गुमराह तो वोह लोग होते हैं

जो घर से निकलते ही नही..

पराभव

|| छत्रपती सुत्र ||

जोपर्यंत आपण आपल्या मनाने हार स्वीकारत नाही,
तोपर्यंत आपला पराभव झालेला नसतो..

@ अनिल माने.

नवा प्रवास

|| छत्रपती सुत्र ||

आपणच निवडलेली एखादी छोटी वाट एखाद्या नवीन प्रवासाची सुरुवात होऊ शकते.

दुसऱ्यांच्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघितले तर आयुष्य जास्त सुंदर दिसते..

© अनिल माने.

Be Positive

|| छत्रपती सुत्र ||

सकारात्मक विचार सकारात्मक उर्जा आकर्षित करतात.
सकारात्मक उर्जा सकारात्मकच कार्य घडवुन आणते.
नेहमी सकारात्मक विचार करा.

@ अनिल माने.

सावली बना

|| छत्रपती सुत्र ||

झाडाला एकच पान असले तरी ते आपली सावली निर्माण करते,
कारण उन्हाच्या झळा त्याने अनुभवलेल्या असतात.

माणसानं यापेक्षा वेगळे काही करण्यापेक्षा,
आपणही कुणाच्यातरी आयुष्यात सावली कसे होऊ शकेल हा विचार करणे खरी माणुसकी ठरेल..

© अनिल माने.

पराक्रमी मातृत्व

|| छत्रपती सुत्र ||

पराक्रमाचं मातृत्व जरी पुरुषांकडे असलं
तरी
मातृत्वाचा पराक्रम फक्त स्त्रीच करु शकते..

राष्ट्रमाता जिजाऊंचा जयजयकार

Saturday, 2 August 2014

अडथळे

|| छत्रपती सुत्र ||

वाटेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी अडथळ्यांचा सामना न करणाऱ्या माणसांपेक्षा
अडथळ्यांवर मात करुन जाणारी माणसे अधिक सुरक्षीत असतात.

आपले यश हे आपण प्राप्त केलेल्या पदावरून किंवा स्थानावरुन ठरवले जात नाही
तर
ते स्थान किंवा दर्जा मिळविण्यासाठी जे अडथळे पार करावे लागले त्यावरुन ठरतं..

@ अनिल माने.

स्वप्नांवर लक्ष

|| छत्रपती सुत्र ||

बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने लक्षात नाही राहीली तरी चालतील
पण
उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर नेहमीच लक्ष ठेवता आलं पाहिजे.

कळी उमलल्याशिवाय फुलाच्या सुगंधाची किंमत कळत नाही..

© अनिल माने.

निर्णयसिध्दता

|| छत्रपती सुत्र ||

आयुष्यात घेतलेला कुठलाच निर्णय चुकीचा नसतो
पण
तो किती बरोबर आहे ते सिध्द करुन दाखवावा लागतो.
मग तो घेतलेला निर्णय चांगला असो अथवा वाईट असो..

@ अनिल माने.

दृष्टी तशी सृष्टी

|| छत्रपती सुत्र ||

या जगात कोणालाच निरर्थक समजु नका.
समाजावर जेव्हा नैसर्गिक संकटे,अपघात येतात
तेव्हा या समाजातील विचारवंत,तत्वज्ञानी,सज्जन माणसं निरुपयोगी ठरतात
आणि
समाजाने ज्यांना "टवाळखोर" म्हणुन हिणवलेले असते,
अशी चौकात बसुन टवाळक्या करणारी माणसंच उपयोगी ठरतात.

प्रत्येकात चांगुलपणा असतो.
आपल्या बघण्याची दृष्टी तशी पाहीजे..

@ अनिल माने.

सदाचार

|| छत्रपती सुत्र ||

ज्यांचे चारित्र्य,आचार,विचार आणि कृती भक्कम असते,

तेच लोक जीवनात सदाचाराच्या मार्गाने पावले टाकतात
आणि
जीवनाचे ध्येय गाठतात..

@ अनिल माने.

दिशाहीन प्रवास

|| छत्रपती सुत्र ||

ज्या प्रवासाला ध्येय नाही,तो प्रवास दिशाहीनच असतो
आणि
जो प्रवास दिशाहीन असतो,तो प्रवास कधीच संपत नाही.

समुद्रात भरकटली नाव
आणि
ध्येयहीन माणुस यांचा प्रवास स्वतःच्या इच्छेप्रमाणे कधीच होत नाही..

@ अनिल माने.

वेदना

|| छत्रपती सुत्र ||

जे धडपड करतील त्यांनाच वेदना होतील
आणि
वेदना झाल्याशिवाय मिळणाऱ्या यशाचा आनंद हा कवडीमोल असतो.

जे किनाऱ्यावरच उभे राहतील ते कधीच पोहायला शिकणार नाहीत..

© अनिल माने.

यश - अपयश

|| छत्रपती सुत्र ||

अपयशाचा ॠतु हीच यशाचे बीज पेरण्याची सर्वात चांगली वेळ असते..

अपयश तुम्हाला जगाची ओळख घडवते
आणि
यश जगाला तुमची ओळख घडवते..

@ अनिल माने.

नवी पायवाट

|| छत्रपती सुत्र ||

रुळलेल्या आणि मळलेल्या पायवाटा या जुन्याच ठिकाणी जात असतात.

नवीन ठिकाणावर जायचे असेल तर स्वतःलाच नवीन पायवाट तयार करण्याचे कष्ट घ्यावे लागते..

@ अनिल माने.

प्रयत्न आणि आळस

|| छत्रपती सुत्र ||

माणसाचे यश हे त्याच्या प्रयत्नांना आणि अपयश हे त्याच्या आळसाला चिकटलेले असते..

@ अनिल माने.

शिवमान्य ६ जुन

|| शिवमान्य ६ जुन ||

शिवरायांनी राज्याभिषेकासाठी ६ जुन हीच तारीख का निवडली ?

● आपल्या कर्तृत्वाची जाणीव दाही दिशांना आणि आलम दुनियेला व्हावी आणि त्याचवेळी मोगलांना ह्या देशात स्वतंत्र स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना झाली हे कळावे यासाठीच कोणत्याही मुहुर्ताची वाट न बघता महाराजांनी ६ जुन ही तारीख जाणीवपुर्वक राज्याभिषेकासाठी निवडली.
मोगलांना त्यांच्या ढासळत्या डोलाऱ्याची जाणीव करुन दिली.त्यांचा तिळपापड केला.

● महाराजांच्या राज्यभिषेकास त्याकाळी धर्मविधी करणाऱ्या सर्वच पुरोहीत ब्राह्मण वर्गाने जाहीर विरोध केला आणि महाराज वैदिक धर्मानुसार शुद्र असल्यामुळे राज्याभिषेकास पात्र नाहीत असेच सगळे ब्राह्मण पुरोहीत सांगत होते.यामुळे महाराजांनी राज्यभिषेकासाठी काशीवरुन भरमसाठ लाच देऊन गागाभटासारख्या पुरोहीताला आणावे लागले.

● ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस.कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस.
देशात मृग नक्षत्र ७ जुनलाच सुरु होते.त्यात काहीच बदल नाही.महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात.म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासून सुरु होतात.शेतकऱ्यांना सोयीचे जावे व शेतकऱ्यांचाच एक आनंदाचा क्षण ठरावा,म्हणुन त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणुन ६ जून हा दिवस निवडला गेला.

● त्याकाळी ६ जून १६७४ रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते,पाऊस नव्हता,शेतकऱ्यांनापण सोयीचे होते.हे सुध्दा महत्वाचे कारण आहे.

● जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता त्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता.
कारण दक्षिणायण-उत्तरायण भानगड.
परंतु महाराजांना वेगेवेगळ्या शत्रुंच्या हालचालींवर लक्ष देणे आवश्यक होते.लोक दक्षिणायन वर्ज्य मानतात.परंतु महाराज आवर्जुन दक्षिणायनातील जुन महिना निवडतात,कारण शत्रुला चकमा देण्यासाठी.
राज्य राहिले तर राज्याभिषेक होईल,म्हणुन राज्य-रयत ह्यांची काळजी अगोदर.

● मुहूर्त पंचांग आणि योग्य संधी याचा काही संबंध नसतो हे महाराजांनी अनेक मोहिमा आणि त्यातच राज्यभिषेक या सर्वात मोठ्या प्रसंगीही सिद्ध करून दाखविले.

● ६ जुन तारीख निवडण्यामागे आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता.
औरंगजेबाचा सिंहासनरोहणाचा खास कार्यक्रम ५ जुन १६५९ या दिवशी झाला होता.
आता तुमच्या मोगलाईचा अस्त होऊन स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितीजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी ५ जुनच्या मध्यरात्रीपासुन राज्यभिषेक प्रक्रिया सुरु करुन ६ जुन १६७४ रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक केला..
महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब हताशपणे उद्गारला…………
" या खुदा । अब तो हद हो गई ।
तू भी उस सिवा के साथ हो गया !
सिवा "छत्रपती " हो गया ।"

|| काळजात वाजली एकच धुन ||
    || चलो रायगड ६ जुन ||