Tuesday, 16 December 2014

मात

|| छत्रपती सुत्र ||

उसन्या बळावर लढणारे लोक दुर्बलतेचे पाईक आहेत.

उसने बळ घेऊन ओरडायला ताकत लागत नाही,खरी ताकत तर शांत रहायला लागते.

तुमचे शांत राहणे ही तुमची दुर्बलता नसुन ती उसन्या बळावर ओरडणाऱ्यांच्या आवाजावरील दणदणीत मात आहे.

© अनिल माने.
=========================

वणवा गैरसमजांचा

|| छत्रपती सुत्र ||

जंगलात पेटलेल्या वणव्यात जोपर्यंत पालापाचोळा येत असतो तोपर्यंत हा वणवा न विझता तसाच पेटत राहतो आणि जंगलाची राख करतो.

नात्यांमधे दुरावा निर्माण करणारा वणवा हा अशाच गैरसमज आणि अफवांच्या पालापाचोळ्यावर पेटत राहतो.हा पालापाचोळाच संपला की ही वणवाही आपोआप विझुन जातो.

© अनिल माने.
===========================

सातत्य

|| छत्रपती सुत्र ||

शेवटच्या घावाने दगड फुटला म्हणुन आधीच्या घावांचे काहीच महत्व नाही असे नाही.

प्रयत्नातील सातत्यच तुमच्या यशाचे कारण बनते.
जशी पाण्याची संततधार कठीण खडकाचीही माती करुन टाकते..

© अनिल माने.
=======================

धार

|| छत्रपती सुत्र ||

बोथट शस्त्रे रणांगणावरील लढाईत निरुपयोगी ठरतात,
परंतु त्यांना धार लावली तर त्यांचेही मुल्य वाढते.

स्पर्धेच्या युगात विचारांची धार नसलेले लोक मागे पडतात,
परंतु बुध्दीला विचारांची धार असेल तर ते स्पर्धेत विजयी होतात.

© अनिल माने.
===========================

उत्कर्ष आणि संघर्ष

|| छत्रपती सुत्र ||

उत्कर्षाच्या मुक्कामाला पोचायचे असेल तर संघर्षाचा मार्ग पार करावा लागतो.

या संघर्षात प्रतिस्पर्धी कोण आहे त्यापेक्षा त्याच्या आणि आपल्या जमेच्या व कमकुवत बाजुंचे योग्य ज्ञान असेल तर या संघर्षाची पातळी कमी होते.
मात्र संघर्ष अटळ असतो.

© अनिल माने.
===========================

शोधा म्हणजे सापडेल

|| छत्रपती सुत्र ||

विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहीरीतील दगडांकडे नसते तर त्या दगडांमधेही कुठेतरी पाणी दिसते का हेच ते पाहत असतात.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचे निरीक्षण करतानाही त्याच्यातील वाईट गोष्टीऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टीसुध्दा सापडतील.

© अनिल माने.
===========================

उत्कर्ष

|| छत्रपती सुत्र ||

स्वतःचा उत्कर्ष होण्यासाठी इतरांचा द्वेष करुन काहीच मिळत नाही.

स्वतःच्या दुर्गुणांवर प्रेम आणि इतरांच्या सद्गुणांचा द्वेष करायचे सोडुन दिले तर तुमचाही उत्कर्ष निश्चित आहे.

© अनिल माने.
===========================

धागा

|| छत्रपती सुत्र ||

संवाद हा नात्यांना जुळवुन ठेवणारा धागा आहे.हा धागा आहे तोपर्यंत नात्यांमधे जिव्हाळा असतो.

जेव्हा हा धागा सैल होईल तेव्हापासुन नात्यातील दरी वाढत जाते.

© अनिल माने.
===========================

सुरुवात

|| छत्रपती सुत्र ||

आयुष्यात कोणतीही गोष्ट पुर्ण करायची असेल तर आधी त्या गोष्टीला सुरुवात करावी लागते.

केवळ सुरुवात करण्यावाचुनच आयुष्यात ठरवलेल्या बहुतांश गोष्टी तशाच राहुन जातात.

© अनिल माने.
===========================

आकलन - विश्लेषण

|| छत्रपती सुत्र ||

भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमानाचे आकलन करता आले पाहिजे,त्यासाठी भुतकाळाचे विश्लेषण आवश्यक असते.

उंचावर जायचे असेल तर आधी आपण खोलात आहे याची जाणीव झाली पाहिजे,त्यासाठी खोलीचा अंदाज घेता यायला हवा.

© अनिल माने.
===========================

स्वतःसाठी वेळ द्या

|| छत्रपती सुत्र ||

धावपळीच्या,धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात माणसांना सगळ्या गोष्टींचा विचार विचार करायला वेळ आहे,पण स्वतःबद्दल विचार करायला वेळ नाही.

जीवनातील प्रत्येक टप्प्यावरील आनंद मिळवा,स्वतःसाठी वेळ द्या.तुमचे हे जीवन परत नाही.

© अनिल माने.
=======================

आत्मपरीक्षण : एक गरज

|| छत्रपती सुत्र ||

आत्मपरीक्षण ही स्वतःला सुधारण्याची आणि अथक परीश्रम ही स्वतःची प्रगती करण्याची सोपी प्रक्रिया आहे.

आत्मपरीक्षणाने आपल्या कमतरता शोधता येतात आणि अथक परीश्रमाने त्या दुर करुन यश मिळवता येते.

© अनिल माने.
===========================

प्रयत्नवाद आणि आशावाद

|| छत्रपती सुत्र ||

प्रयत्नवादी लोक ध्येय पार करण्यात अपयशी ठरले तरी खचुन जात नाहीत,
आपले आणि ध्येयातील अंतर आपण कमी करु शकलो याबाबत ते आशावादी असतात.

प्रयत्नवादाला आशावादाची जोड असेल तर आपल्यातला आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि हीच ध्येयपुर्तीसाठी सर्वात आवश्यक असणारी गोष्ट आहे.

© अनिल माने.
===========================

स्वयंप्रकाशित

|| छत्रपती सुत्र ||

चमकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे.

दुसऱ्याच्या प्रकाशात तुम्ही चमकु शकत नाही,दुसऱ्याच्या तेजात तुम्ही झळकु शकत नाही.

© अनिल माने.
===========================

आचरण

|| छत्रपती सुत्र ||

मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्यावरच माणुस मोठा होत नाही,
तर छोट्या छोट्या गोष्टी समजुन घेतल्यानेही तो मोठा होतो.

विचार छोटा असो वा मोठा,
त्याच्या आचरणानेच त्याला मुल्य प्राप्त होते.

© अनिल माने.
===========================

कर्तव्य

|| छत्रपती सुत्र ||

आयुष्यात अनेकदा येणाऱ्या संभ्रमाच्या प्रसंगांतुन मार्ग काढण्यासाठी नेहमी आपल्या कर्तव्याला महत्व द्या.

तुम्ही ज्यावेळी कर्तव्याला प्राधान्य देऊन धडपड चालु करता,
त्यावेळी बाकी साऱ्या संभ्रमाच्या समस्यांवर सुध्दा मार्ग निघायला सुरुवात होते..

@ अनिल माने.
===========================

विचार स्वभावाचे निदर्शक

|| छत्रपती सुत्र ||

आपल्या विचारातच उंची असेल तर शत्रुच्या मनातसुध्दा आपल्या बद्दल आदर निर्माण होतो.

विचार हेच माणसाच्या स्वभावाचे निदर्शक असतात.

© अनिल माने.
===========================

स्वतःचे मत

|| छत्रपती सुत्र ||

इतरांचे मत हे तुमचेच मत म्हणुन सांगितले तर इतरांच्या मतांवर उठणाऱ्या प्रश्नांचे उत्तर सुध्दा तुम्हाला स्वतःलाच द्यावे लागते.

घडणाऱ्या घटनांकडे स्वतःच्या नजरेने पाहिल्यावर जे दिसते ते इतरांच्या नजरेतुन दिसतेच असे नाही.

© अनिल माने.
===========================

उंची

|| छत्रपती सुत्र ||

पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने सर्वांवर बरसते.

माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणुस आयुष्यात हवी ती उंची गाठु शकत नाही.
परीश्रमाने गाठलेली उंचीच माणसाच्या आयुष्यात आनंदाची बरसात करु शकते.

© अनिल माने.
=========================

ज्ञान आणि कृतीशिलता

|| छत्रपती सुत्र ||

लक्ष्यापर्यंत पोचण्याचे रहस्य केवळ रस्त्यावरील दिशादर्शक दगडावरील अंतर वाचता येण्याचे ज्ञान नाही तर आपण स्वतः ते लक्ष्य गाठण्यासाठी केलेली पायपीट हे पण आहे.

ज्ञानासोबत कृतीशिलता हाच लक्ष्य गाठण्याचा योग्य मार्ग आहे.या मार्गाला कोणतीच आडवाट नाही.

© अनिल माने.
===========================

वर्चस्वाची लढाई

|| छत्रपती सुत्र ||

वर्चस्वाच्या लढाईत नैतिकतेचा अंत होतो.

सिंह एकटा असला तरी जंगलाचा राजाच असतो,
परंतु राजेपणाच्या वर्चस्वासाठी जेव्हा सगळे सिंह एकमेकांशी लढुन मरतात,तेव्हा जंगलातील लांडगेसुध्दा त्यांचे लचके तोडुन नेतात.

© अनिल माने.
===========================

वाद आणि नाती

|| छत्रपती सुत्र ||

वादात जिंकल्यानंतर मिळालेला क्षणिक आनंद तुमच्यात गर्व निर्माण करतो.

वादामध्ये जिंकणारा माणुस नात्यांमध्ये नेहमीच हरतो..

© अनिल माने.
=========================

गरुडभरारी

|| छत्रपती सुत्र ||

बोलके पोपट मोठमोठ्या गप्पा मारत असताना गरुड मात्र शांत बसुन राहणे पसंत करतात.

कारण गरुडाला माहित असते की पोपट कितीही मिठुमिठु बोलु शकतो,
परंतु वेळ आल्यावर गरुडाप्रमाणे उंच आकाशात भरारी मारु शकत नाहीत.

© अनिल माने.
========================

ठेच

|| छत्रपती सुत्र ||

सरळ वर पाहुन पुढेच चालत राहणाऱ्यांना अधेमधे लागणाऱ्या ठेचा या कधीकधी आवश्यकच असतात.ठेच लागल्याशिवाय माणुस थांबत नाही.

ही ठेच माणसात आत्मपरिक्षणाची गरज निर्माण करते,आत्मपरीक्षणाने माणसाला आपल्या मागील चुका सुधारण्याचे भान येते.

© अनिल माने.
===========================

आनंद निर्मीतीचा

|| छत्रपती सुत्र ||

इतरांनी निर्माण केलेल्या गोष्टीचा उपभोग सर्वजण घेऊ शकतात,परंतु त्या गोष्टीच्या निर्मितीचा आनंद फक्त ती गोष्ट निर्माण करणाराच घेऊ शकतो.

सत्ता उपभोगण्यासाठी परकीयांचे जोडे उचलणाऱ्या वतनदारांपेक्षा स्वराज्य निर्मितीचा आनंद घेणारे मावळेच आज जास्त गौरवान्वित केले जातात.

©Copyright अनिल माने.
===========================

मार्ग

|| छत्रपती सुत्र ||

किल्ला किती जरी कठिण असला तरी तो सर करण्याचा एखादातरी मार्ग असतोच.

संकट कितीही मोठे असले तरी त्या संकटावर मात करण्याचा एकतरी मार्ग नक्कीच असतो.

© अनिल माने.
===========================

संवाद

|| छत्रपती सुत्र ||

गैरसमजाचा वणवा नात्यांचे जंगल जाळुन टाकतो.

हा वणवा जागच्या जागीच विझविण्यासाठी संवादाच्या सरी कोसळाव्याच लागतात.

© अनिल माने.
=======================